युद्धापेक्षाही प्राणांतिक

युद्धापेक्षाही प्राणांतिक जखमा करणारी
वाटतात मला युद्धानंतर जन्माला आलेली दुःखं
की वाताहतीला कसला अर्थच नसतो
जगण्या-मरण्यात गुंतलेले नसतात आसक्त संदर्भ
माणसावर प्रेम करणारा कुणी ईश्वर असेल
यावरचा विश्वास उडतो
अन् वैरी आयुष्याचं हृदय फुटून वाहत राहतं भय
तेव्हा त्या काळ्या प्रवाहाला कोणता किनाराही नसतो

तू असतोस विनाशाच्या धूमधडाम आवाजांपलिकडे
शांतपणे निजलेला आश्वस्त
तुझं डोकं माझ्या कुशीत स्वस्थ असतं
पण तुझ्यावरून पांघरलेल्या पदराइतकं अपुरं
कोणतंच वस्त्र नसतं जगात
हे मला पुरतं ठाऊक असतं

युद्ध हा शब्द त्याच्या अर्थासकट
लांब रहावा तुझ्यापासून
पोहोचू नये धग तुझ्या अस्तित्वाच्या प्रतिष्ठेला
अन् तुझ्या नितळ निष्पाप जाणिवांचे,
मनोरथांच्या भरघोस लवथवीचे प्रदेश
अस्पर्शच राहावेत विनाशाला
या माझ्या तगमगत्या इच्छेला कुठलाच ठाव नाही
हे कळते रे मला

माझ्या आत्म्यानं उच्चारलेल्या
पहिल्या प्रार्थनेसारख्या अनघड मुला
तुला अटळच आहे या झंझावाती जगातल्या
प्रलयंकर अनुभवाचा स्वीकार
पण तू असावेस स्वतःशी सहृदय
आणि माझ्यासारख्या सर्व पराभूतांसाठी
समजुतीने झुळझुळत राहावेस
युगातून भटकणाऱ्या यात्रेकरू प्रेमासाठी
उघडून धरावेस तुझे दार
मरणाच्या गळ्यात असतेच जन्माची तहान, हे जाणून असावेस

असलाच जर अटळ संघर्ष तर लढावेस सृजनाच्या बाजूने
आणि कधीकाळी जर भेटलाच तुला
युद्धातून पाठ फिरवून निघून गेलेला ईश्वर
तर माझ्यासकट प्रत्येक आईची तगमग स्मरून
त्याचे गुन्हे पदरात घालावेस

© Aruna Dhere
Audio production: Goethe Institute, 2015