काय होते ?

इतक्या असंख्य सद् भावना जन्म घेतात मनामध्ये,
अनोळखी माणसांसाठी सुद्धा किती भरून येते
पंख फुटल्या अंगाने शुभेच्छा येतात वस्तीला,
या साऱ्यांचे नंतर काय होते ?

एका तरी फुलाचे मरण
लांबते का एखादा क्षण ?

एकटे पोळणारे दुःख अनिकेत
येते का सांत्वनाच्या सावलीत ?

करुणेनं भिजतो का थोडा
निर्दयतेचा काठ ?
थांबते का एखादी विनाशाची लाट ?

सगळे भवतालच मोडून, चिरडून चाललेले
पाचोळ्यासारखे झालेले कुठलेही नाते
मनातल्या सद् भावनांचे आणि शुभेच्छांचे
खरेच मग काय होते ?

© Aruna Dhere
Audioproduktion: Goethe Institute, 2015